Ad will apear here
Next
चिऊताई, चिऊताई दार उघड!
 

मंगेश पाडगांवकर म्हणजे जीवनाचं आनंदी गाणं गाणारे आणि सकारात्मकतेचा संदेश आपल्या कवितांतून देणारे कवी. ‘चिऊताई, चिऊताई दार उघड!’ आणि ‘सांगा कसं जगायचं?’ या त्यांच्या कविताही त्याचीच साक्ष देतात. ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमात या कविता आपल्यासमोर सादर केल्या आहेत पुण्यातील गायिका आणि अभिवाचक चैत्राली अभ्यंकर यांनी...
............
मंगेश पाडगांवकर
चिऊताई, चिऊताई दार उघड!

चिऊताई, चिऊताई दार उघड!
चिऊताई, चिऊताई दार उघड!
दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा!

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात!

गाणाऱ्या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात!

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील!
तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं!

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं!

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं!

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फूल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मूल असतं!

फुलणाऱ्या या फुलासाठी,
खेळणाऱ्या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!

निराशेच्या पोकळीमधे
काहीसुद्धा घडत नाही!
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही!

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो!
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो!

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं!
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही!
तुझं घर बंद होतं,
डोळे असून अंध होतं!

बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड!
- मंगेश पाडगांवकर
...........
सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
- मंगेश पाडगांवकर

(मंगेश पाडगांवकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/wtck5N येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZYRBM
Similar Posts
मंगेश पाडगावकर यांच्या सकारात्मक संदेश देणाऱ्या काही कविता (व्हिडिओ) जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहणारे कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. ३० डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या काही कविता सादर केल्या आहेत पुण्यातील गायिका आणि अभिवाचक चैत्राली अभ्यंकर यांनी...
कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितांचे अभिवाचन (व्हिडिओ) १० मार्च हा कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन. पाडगावकर म्हणजे जीवनाचं आनंदी गाणं गाणारे आणि सकारात्मकतेचा संदेश आपल्या कवितांतून देणारे कवी. ‘चिऊताई, चिऊताई दार उघड!’ आणि ‘सांगा कसं जगायचं?’ या त्यांच्या कविताही त्याचीच साक्ष देतात. पुण्यातील गायिका आणि अभिवाचक चैत्राली अभ्यंकर यांनी या केलेल्या या कवितांच्या अभिवाचनाचा व्हिडिओ पाहा
पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त बिल्हण संगीतिकेचे आयोजन पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. १२ जून हा पुलंचा स्मृतिदिन. यानिमित्त पु. ल. कुटुंबीय, कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘एक पुलकित सकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी
माझे जीवनगाणे सात नोव्हेंबर हा पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन, तर आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. याचं औचित्य साधून ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात आज पाहू या ‘माझे जीवनगाणे’ या मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी गायलेल्या आणि ‘पुलं’नी संगीत दिलेल्या गाण्याबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language